प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले जाहीर
नागपूर, दि. १९: लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त झालं तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष प्रणीत महायुतीने सपाटून मार खाल्ला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अगदी नाट्यमयरित्या भाजपच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मंत्रीपदावरून सुट्टी देण्याची पक्षाकडे मागणी केली. या वक्तव्यानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्रात बदली होईल आणि केंद्रातून विनोद तावडे यांना महाराष्ट्रात पुन्हा पाचारण करण्यात येईल असं वातावरण तयार झालं होतं. परंतू,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्त्व करतील, असे स्पष्ट करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते आज नागपूर विमानतळावर माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे, असे ते पुढे म्हणाले. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी आखलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्यासाठी भाजपा महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
