मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय झाला असल्याची भावना केली व्यक्त
मुंबई, दि. २७: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या आजच्या निर्णयाबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असं सांगितलं जात होतं, मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय केला आहे, असं मत भुजबळ यांनी आज नाशिक येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. शासनाने प्रसिद्ध केलेला अधिसूचनेवर १६ फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत त्यामुळे ओबीसी आणि अन्य समाजातल्या नागरिकांनी हरकती नोंदवाव्या असं आवाहन त्यांनी केलं.
अशा प्रकारचं आरक्षण केवळ सामाजिक दबावापोटी दिलं गेलं तर दलित आणि ओबीसींचं आरक्षण धोक्यात येईल, उद्या मुंबईत आपल्या शासकीय निवासस्थानी या संदर्भात ओबीसी, दलित, आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेणार असून आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहनही भुजबळ यांनी केलं. तर, सरसकट दाखल्यांचा प्रश्न सरकारने मार्गी लावलेला नाही, ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांच्याबाबत शासन कसा मार्ग काढणार आहे, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
Source – AIR
