कायदेशीर पेच व मुंबई पोलिसांची नोटीस… तरीही मनोज जरांगे पाटीलांचा काफिला मुंबईच्या दिशेने करतोय मार्गक्रमण
मुंबई, दि. २५: मराठा आरक्षण आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तर मनोज जरांगे यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्याचे निर्देश आझाद मैदान पोलिसांना दिले आहेत. उद्यापासून मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत. हा मोर्चा रोखण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी याचिका विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती, त्यावरील सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.
दरम्यान मराठा आंदोलकांनी मुंबईत न येता नवी मुंबईत खारघर इथल्या इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदानावर इथं आपलं आंदोलन करावं, अशी सूचना मुंबई पोलिसांनी केली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला पोलिसांनी दिला. आझाद मैदान येथे इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांना सामावून घेता येणार नाही, असं आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सकल मराठा समाजाला एका पत्राद्वारे कळवलं होत. परंतू, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मुंबईत आंदोलकांसह आपण पोहोचणारचं असा निर्वाणीचा इशारा दिला. जरांगे पाटील यांची पदयात्रा लोणावळ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाली असून आज मध्यरात्री पर्यंत नवी मुंबईतील कृषी उत्पन्न समितीच्या आवारात पोहोचेल असे सांगितले जाते आहे. त्यानंतर मराठा आंदोलक उद्या २६ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होतील.
