विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून घणाघाती टीका
मुंबई, दि. १६: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अन्यायकारक निकाल दिल्याचा सूर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मुंबईत आयोजित ‘जनता न्यायालय’ या कार्यक्रमात सर्व नेत्यांनी आळवला. आमच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही म्हणून नार्वेकर यांच्याविरोधात शिंदे यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. आमचे सर्व आमदार या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देतील, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. सत्तेचा मोह नव्हता म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेनेच्या घटनेत २०१३ आणि २०१८ मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीची कागदपत्रं निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्याची पोचपावती शिवसेना आमदार अनिल परब यांनी सादर केली.

या घटनादुरुस्तीत पक्ष प्रमुख पदावर उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाली आणि त्यांना सर्व निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देण्याचे ठराव झाल्याचं परब म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेचे व्हिडीओ चित्रण दाखवले त्यात एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर यांच्यासह शिंदे यांच्यासोबत उपस्थित असलेले अनेक आमदार उपस्थित असल्याचं दिसत होते. याच घटनादुरुस्तीच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, राज्यसभा सचिवालय यांनी शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांना लिहिलेली पत्र परब यांनी यावेळी सादर केली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे :
- सुप्रीम कोर्टाकडून आता शेवटची आशा आहे. लोकशाहीचा मूलभूत घटक असणाऱ्या जनतेच्या न्यायालयात आपण आलो आहोत!
- माझं आव्हान आहे. नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा !
- शिवसेना जर तुम्ही विकली असाल; तर मी जिथे जिथे जातो, तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे?
- राज्यपालांना विनंती करतो, एक अधिवेशन पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो; विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला त्यांना!
- व्हीपचा अर्थ आहे चाबूक! चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो!
- आपण निवडणूक आयोगावर एक केस करायला पाहिजे. आपण शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्र लिहिली होती. मग सरकारने गाद्या पुरवल्या नाहीत, म्हणून निवडणूक आयोग त्यांना गाद्या समजून झोपलंय का?
- मला सत्तेचा मोह नव्हता; एका क्षणात मी वर्षा सोडलं आणि एका क्षणात मुख्यमंत्री पदही सोडलं!
- आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार, की लवाद त्याच्या डोक्यावर बसणार; हे पाहण्याची ही लढाई आहे ! सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायचा, की लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा; ही लढाई उद्या होणार !
- सुप्रीम कोर्टाने तयारी करून दिली, पण लवाद म्हणतो; ह्यांना फाशी कशी देऊ? ह्यांच्या जन्माचा दाखलाच नाही. पण कोर्टाने जन्माचा दाखला तपासण्यास नाही तर, जो गुन्हा केलाय त्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं ! कोर्ट फाशीची शिक्षा सुनावतं; पण प्रत्यक्ष अमलात आणतो जल्लाद! त्या जल्लादाचं काम ह्या लवादाला दिलं होतं !
- ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले, घटना लिहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले; त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली!
- सर्वोच्च न्यायालयाबद्दल आमच्या मनात विश्वास, आदर आहे. मात्र आजपासून ही खटल्याची सुनावणी मी माझ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या दरबारामध्ये नेत आहे !
