राज्यातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शांततेत मतदान संपन्न
मुंबई, दि. ५: राज्यातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी त्याचबरोबर २ हजार ९५० रिक्त जागा आणि १३० सरपंचपदासाठी आज दि. ५ नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झालं. गडचिरोली आणि गोंदियामध्ये मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत तर उर्वरीत भागात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झालं. नागपूर जिल्ह्यात ३५७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ५ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांसाठी आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत दुपारी तीन वाजेपर्यंत ६६ पूर्णांक ९७ शतांश टक्के, तर ३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ६३ पूर्णांक ८४ शतांश टक्के मतदान झालं.
रत्नागिरी जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५५ पूर्णांक ४५ शतांश टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी ५७ पूर्णांक ६४ शतांश टक्के मतदान झालं. सोलापूर जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७० पूर्णांक १३ दशांश टक्के मतदान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दुपारी दुपारी दीड वाजेपर्यंत ५९ टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी ५३ टक्के मतदान झालं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, शहापूर आणि मुरबाड ग्रामपंचायतीसाठी तर लातूर जिल्ह्यातल्या १३ ग्रामपंचायतीपैकी १२ ठिकाणी आज मतदान झालं. वाशिम जिल्ह्यातल्या ६० ग्रामपंचायतींच्या रिक्त ७६ सदस्यांच्या रिक्तपदासाठी आज मतदान झालं. रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सर्वत्र शांततेत मतदान झालं. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत ३२ पूर्णांक ८४ शतांश टक्के मतदान झालं होतं. यवतमाळ आणि जालना जिल्ह्यातही शांततेत मतदान झालं. या निवडणूकांची मतमोजणी ७ नोव्हेंबरला होणार आहे.
Source – AIR
