१७ दिवस चालू असलेल्या आमरण उपोषणाचा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला शेवट
जालना, दि. १४: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज आपले उपोषण मागे घेतले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे गेले १७ दिवसांपासून उपोषणावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण संपवले. अशा रीतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण आज संपले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती दिसून आली.
जरांगे यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यांनी काल मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर उपोषणही संपवण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी अंतरवली गावात पोहोचून जरांगे यांच्याशी चर्चा करून उपोषण संपवण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी अखेर उपोषण सोडले.
