राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आऊट?
बंगळुरु, दि. १८: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी (१८ जुलै) बेंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी हे वक्तव्य केले. खरगे म्हणाले की, काँग्रेसला सत्तेचा लोभ नाही.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या सुरू असलेल्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सांगितले की, काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही. या वक्तव्यानंतर राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याच्या अटकळांना मोठा धक्का बसला आहे.
याच संबंधी थोड्याच वेळापूर्वी मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक ट्वीट करत बंगळुरु येथील बैठकीमागची भूमिका स्पष्ट केला. ते म्हणाले की, “मला आनंद आहे की बेंगळुरूमध्ये २६ पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. आज आम्ही ११ राज्यांमध्ये सरकारमध्ये आहोत. भाजपला एकट्याच्या जिवावर ३०३ जागा मिळाल्या नाहीत. आपल्या मित्रपक्षांच्या मतांचा वापर करून ते सत्तेवर आले आणि नंतर त्यांना टाकून दिले. आता भाजप अध्यक्ष आणि त्यांचे नेते त्यांच्या जुन्या मित्रपक्षांशी जुळवून घेण्यासाठी राज्य-राज्यात धाव घेत आहेत. येथे जे ऐक्य दिसत आहे त्याचा परिणाम पुढील वर्षी पराभवात होईल, अशी भीती त्यांना वाटत आहे.”
पुढे भाजपवर निशाणा साधत ते म्हणातात की, “प्रत्येक संस्था हे विरोधकांच्या विरोधात शस्त्र बनवले जात आहे. या बैठकीत आमचा हेतू स्वत:साठी सत्ता मिळवण्याचा नाही. तर तो लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे रक्षण करण्यासाठी आहे. भारताला पुन्हा प्रगतीच्या, कल्याणाच्या आणि खऱ्या लोकशाहीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करूया.”
