पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबई, दि. १४: गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. येत्या ३-४ दिवसांत दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबईत ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत हा पाऊस असाच सुरू राहणार आहे.
आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत असून, काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दावा केला की उपनगरात गाड्या वेळापत्रकानुसार धावत होत्या, तर प्रवाशांनी सेवांमध्ये १५ मिनिटे उशीर झाल्याची तक्रार केली. सकाळपासून शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाने जोर धरला असून जलजीवन प्रभावित झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात १२२ मिलीमीटरच्या सरासरीनं ९७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. होडावडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे सावंतवाडी-तळवडे-वेंगुर्ला वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची आणि नोकरदारांची गैरसोय झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरेखोल नदीच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होत आहे. या नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात येणाऱ्या इन्सुली, बांदा, शेर्ले, तळवडे, आरोंदा, किनळे, कवठणी, सातार्डा, सातोसे या नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवश्यक सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत. दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाने आजपासून १७ जुलैपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
यंदा जळगाव जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाल्यावर देखील गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसानं यावल, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांमध्ये एकूण सरासरी ओलांडली आहे. तर पाचोरा, भडगाव आणि धरणगाव या तालुक्यांमध्ये अजूनही पावसाची मोठी तूट आहे. मात्र गेल्या २४ तासात पावसाने विश्रांती घेतली आहे. तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे काल रात्रभर हातनूर धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र सकाळी ४ वाजता सहा दरवाजे बंद करून २४ गेट दीड मिटरनं उघडले आहे आणि धरणातून नदीपात्रात ७२ हजार ८९० कयुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जालना शहरासह तालुक्यातल्या बहुतांश भागात काल संध्याकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अंबड तालुक्यातल्या मठपिंपळगाव, कर्जत, आलमगाव, साडेसावंगी या भागातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतामधून पाणी वाहिलं. या पावसामुळे दुधना नदीला पूर आला आहे. नागपुरात आज सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
नाशिक जिल्ह्यात आणि शहरात पावसाच्या मध्यम सरी पडल्या.
