आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप-शिवसेना(शिंदे गट) सोबत एकत्र लढण्याचे केले सुतोवाच
मुंबई, दि. १५: केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, महाराष्ट्रातील पुढील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी आपला पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले (RPI-A) साठी मंत्रिपदाची मागणी केली आहे. आठवले यांनी बुधवारी रात्री वसई येथे आरपीआय (ए) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
पुढील वर्षी महाराष्ट्रात किमान दोन ते तीन लोकसभेच्या जागा आणि १० ते १५ विधानसभा मतदारसंघात आरपीआय (ए) ला तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा आहेत. आठवले म्हणाले की, आरपीआय (ए) महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी सर्व निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेनेसोबत युती करून लढेल.
वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईत आरपीआय आठवले गटाची बैठक संपन्न झाली. वसई माणिकपूर येथील वायएमसी हॉल येथे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. दरम्यान, आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीत भाजपच्या मदतीने आम्ही आमचा उमेदवार उभा करू, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाविकास आघाडीचे नेते तयारीला लागले असताना दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटानेही दावे करण्यास सुरुवात केली आहे. आठवलेंच्या या घोषणेवर भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.
