‘डॉन डॅडी’ २८ दिवसांच्या सुट्टीवर…
मुंबई : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खुनात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्डचा नावाजलेला डॉन अरुण गवळी याला आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी काही दिवसांनी सुट्टी पाहिजे होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची ‘फर्लो’ सुटी मंगळवारी मंजूर केली.
अरुण गवळी याला देण्यात आलेली सुट्टी मुंबईतील २९ एप्रिल रोजीचे मतदान संपल्यानंतरच म्हणजे ३० एप्रिलपासून लागू होईल, असेही न्या. झेड. ए. हक व न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
अरुण गवळी यांच्याकडून ऍड. राजेंद्र डागा यांनी न्यायालयात बाजू मांडली. यापूर्वी सहा वेळा फर्लो व पॅरोलवर सुटी मिळूनही अर्जदाराने अटींचे उल्लंघन केलेले नाही आणि दिलेल्या तारखेलाच तो तुरुंगात परतला आहे’, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तर दुसरीकडे, मुंबईत २९ एप्रिलला मतदान असल्याने गवळीकडून आदर्श आचारसंहितेचा भंग केला जाऊ शकतो. त्यामुळे फर्लो अर्ज मंजूर करू नये’, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. न्या. झेड. ए. हक व न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने अर्ज मंजूर करतानाच तो ३० एप्रिलपासून लागू होईल, असे आदेशात स्पष्ट केले.
