राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याबाबत पुढील २-३ दिवसात शरद पवार फेरविचार करणार
मुंबई, दि. २: राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाध्यक्ष पद सोडण्यासंदर्भात तसंच आगामी काळात कोणत्याही निवडणुकीला उभं न राहण्याच्या निर्णयावर २-३ दिवसात फेरविचार करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे निर्णय जाहीर केले होते. मात्र नेते आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. अनेक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलं. काही जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले. या निर्णयामुळं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाले होते. शरद पवार यांनी परस्पर असा निर्णय घेऊ नये असं सांगत जयंत पाटील यांना पवार यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.
त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुपारी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शरद पवार यांनी फेरविचार करण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कार्यकर्त्यांनी आंदोलन, उपोषण करु नये, पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ नये, असंही आवाहन शरद पवार यांनी केल्याचं ते म्हणाले. पक्षाचं कामकाज चालवण्यासाठी कार्याध्यक्ष हे पद निर्माण करण्याचा प्रस्ताव त्यांना दिलं असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.
पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असलो तरी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार असल्याचं पवार यांनी सकाळीच स्पष्ट केलं होतं. रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, वसंतदादा साखर इन्स्टिट्युट, यासारख्या संस्थांमध्ये कार्यरत राहणार असल्याचं ते म्हणाले होते. दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णय हा पक्षांतर्गत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर काहीही फरक होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
घाणेरडे आरोप-प्रत्यारोप आणि राजकारणाला कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असून राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथन सुरू आहे. त्यामुळं या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्यवेळी त्यावर बोलू, असं ते म्हणाले.
Source – AIR
