विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
मुंबई, दि. १७: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेत, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी आज खारघर इथल्या रुग्णालयांत दाखल रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना, सांस्कृतिक खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. या कार्यक्रमासाठी आलेल्या श्रीसेवकांना पाणी आणि सावलीसह आवश्यक सुविधा देणं ही आयोजकांची जबाबदारी होती, या सुविधा देणं शक्य नव्हतं, तर खुल्या मैदानावर कार्यक्रम घ्यायला नको होता, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “राजकीय मंडळींनी स्वत:च्या निवाऱ्याची काळजी घेतली मात्र लाखो श्री सेवकांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले, त्यांची कोणतीही नीट व्यवस्था केली गेली नसल्याने ही परिस्थिती ओढवली. सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा.”
Source – AIR
