विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी ही केला निषेध
मुंबई, दि. २४: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरातून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर खरमरीत टीका केली आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली..चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाही चे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत.. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल..”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन अधिवेशन सुरु असताना सभात्याग केला. मतमतांतरं असतील तरी देशात स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची खासदारकी रद्द करण्याची घटना पाहण्यात नाही, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. ही बाब संविधानात वा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार घटनेने आपल्याला दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे, असे म्हणत या भूमिकेचा त्यांनी निषेध केला. महापुरूषांनी आपल्याला घटना दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणीत अशी भूमिका बसत नाही. हे सर्व प्रकार जनता बघत आहे. राज्यकर्त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते. या देशाच्या परंपरेला तिलांजली देण्याचे काम झाले. आताच्या काळात ज्या घटना घडत आहेत त्या सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत, असे अजित म्हणाले.
