दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील विदर्भातील तीन, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा दहा जागांवर मतदान होत आहे.
महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी यांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यातील ९७ मतदारसंघांमध्ये १६३५ उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्राच्या दहा मतदारसंघांमध्ये नांदेड, अकोला, बीड, परभणी, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री अनुक्रमे सोलापूर आणि नांदेड मतदारसंघातून उभे आहेत.
दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.
