राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थ्यांत रोष
पुणे, दि. १४: BANRF-2018 (BARTI) अधिछात्रवृति चे Ph.D. संशोधक विद्यार्थी दिनांक १३/०२/२०२३ पासून बेमुदत आमरण उपोषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या समोर सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. संशोधन विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की UGC, SARTI, महा ज्योती प्रमाणे BANRF-2018 पीएचडी च्या २१४ विद्यार्थ्यांना सलग ५ वर्षे फेलोशिप देण्यात यावी. या मागणीसाठी गेली अनेक दिवस विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, प्रधान सचिव तसेच महासंचालक यांच्या कडे पाठपुरावा केला आहे. तरी देखील अद्याप कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. जो पर्यंत ५ वर्ष फेलोशिप करण्याचा निर्णय सकारात्मक लेखी स्वरूपात किंवा ईमेल द्वारे कळविण्यात येत नाही, तो पर्यंत उपोषण स्थगित केले जाणार नाही असे उपोषणकर्ते प्रतिक कांबळे यांनी स्पष्ट सांगितले आहे. या उपोषणाला पाठिंब्या करीता महाराष्ट्रातून संशोधन विद्यार्थी उपस्थित आहेत. हे आंदोलन संशोधन विद्यार्थ्यांचे आत्तापर्यचे तिसरे असून आजवर अनुजातीतील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे हेच दिसून येत आहे.

