राज्यातल्या ७ हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी-विरोधकांत झाली चुरशीची लढत
मुंबई, दि. २०: राज्यात विविध जिल्ह्यांत एकूण ७ हजार ६८२ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज झाली. एकूण सदस्य संख्या ६५ हजार ९१६ असून त्यापैकी १४ हजार २८ बिनविरोध विजयी सदस्य आहेत. निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा ७ हजार ६१९ आहेत. तर, बिनविरोध विजयी सरपंच ६९९ आहेत. ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही.
या निवडणुकीत एकूण ३ हजार २९ ग्रामपंचायतींमधे भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीला विजय मिळाला असल्याचा दावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे निकाल म्हणजे जनतेनं आमच्या सरकारला दिलेला कौल आहे, असं ते म्हणाले. या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसनं ९०० पेक्षा जास्त ग्राम पंचायतींमधे विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजपाचे विजयाचे दावे चुकीचे आहेत, भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातल्या लोकांनी भाजपा आणि शिंदे गटाला सपशेल नाकारलं आहे, अशी प्रतिक्रीया पटोले यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातही काँग्रेसचा विजय झाला आहे, असं पटोले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींची मतमोजणी आज झाली. सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरोली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं असून १८ पैकी १७ जागांवर महाडिक गटानं विजय मिळवला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये सतेज पाटील गटाला झटका बसला आहे. गांधीनगर ग्रामपंचायतमध्येही सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे. या ठिकाणी महाडिक गटाचे संदीप पाटोळे हे सरपंच पदासाठी विजयी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यात ४४७ पैकी ३१ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या असून उर्वरित ३७७ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी कॉैंग्रेसला ११३, भाजपला ८६, कॉंग्रेसला ४२, शिंदे गटाला २९, ठाकरे गटाला ८ तर इतरांना ६८ जागा मिळाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादीनं १३८, भाजपनं ५५, बाळासाहेबांची शिवसेना गटानं ८७, काँग्रेसनं १३, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ५, स्थानिक आघाड्यांनी १२, राष्ट्रीय समाज पक्ष, मनसेने प्रत्येकी १ तर स्थानिक नेतृत्वाने ७ ग्रामपंचायती जिंकल्या.
सोलापूर जिल्ह्यात १७७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठीची मतमोजणी आज झाली. उत्तर सेालापूर तालुक्यात कौवठाळी ग्रामपंचायतीमध्ये काही निकाल तर पाकणी इथं प्रभाग क्रमांक ३चा निकाल समान मतं पडल्यामुळे चिठ्ठी टाकून काढण्यात आले. आहे. पंढरपूर तालुक्यात ११ पैकी ७ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवलं आहे तर उर्वरित ठिकाणी स्थानिक आघाड्यांची सत्ता आली आहे. माढा, मोहोळ, करमाळा, अक्कलकेाट आणि बार्शी तालुक्यातील अनेक ठिकाणी सत्ताधार्यांना पराभवाचा समाना करावा लागला आहे.
भंडारा जिल्ह्यात ३०३ ग्रामपंचायतींपैकी २०६ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. जाहीर झालेले निकाल असे – काँग्रेस – ८५, भाजप – ५३, इतर – ३१, राष्ट्रवादी काँग्रेस – ३०, शिंदे गट – ५, बिएसपी – १, वाशिम जिल्ह्यातल्या २८७ ग्राम पंचायतींपैकी सरपंच आणि सदस्य बिनविरोध झालेल्या ९ ग्राम पंचायती वगळता इतर २७८ ग्राम पंचायतींसाठी मतमोजणी झाली. शिवसेनेला ३१, शिंदे गटाला २९, भाजपाला ४५, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ६५, कॉंग्रेसला ३१ तर वंचित आणि इतर पक्षांना ८६ जागा मिळाल्या आहेत.
जालना जिल्ह्यातल्या २६६ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर १४ सरपंच आणि ४०० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत तर ११८ ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं होतं. त्याची मतमोजणी आज झाली. नाशिक जिल्ह्यात १८८ ग्राम पंचायतींची मतमोजणी आज झाली. धुळे जिल्ह्यात १२८ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतमोजणी झाली. अमरावती जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून उर्वरित २५२ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागला. काँग्रेसला सर्वाधिक ८२ जागा मिळाल्या. ५२ जागी इतर, भाजपाला ४८, प्रहारला ३२, राष्ट्रवादीला २०, शिवसेनेला ८, युवा स्वाभिमानला १२, शिंदे गटाला २ तर वंचितला एक जागा मिळाली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे भाऊ भैया कडू बेलोराचे सरपंच झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यात ४२ ग्रामपंचायतींची मतमोजणी आज झाली. भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाच पैकी दोन, मुरबाडमध्ये १४ पैकी ८, कल्याणमधे ९ पैकी ५ सरपंचपदं भाजपानं जिंकली आहेत. कोनगाव आणि कारिवली ग्रामपंचायतीतही भाजपचा झेंडा फडकला आहे. पालघर जिल्हयात ६३ पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध असून ६१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. आत्तापर्यंत १० निकाल हाती आले असून ठाकरे गटाला ३, बविआला २, इतरांना २, आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि मनसेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
रायगड जिल्ह्यातल्या २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक ७९ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला ४५, शिवसेना ठाकरे गटाला ३८, भाजपला १८, कॉग्रेसला ३,आणि इतरांना ५७ जागा मिळाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२५ ग्राम पंचायतीपैकी भाजप – १८२, उद्धव ठाकरे गट – ७३, ग्रामविकास पॅनल – ३९, शिंदे गट – २४, महाविकास आघाडी – ३ , राष्ट्रवादी – १, अपक्ष – २ जागी विजयी झाले आहेत. एका जागेवर निवडणूक झालेली नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्व ५९ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप – २३, काँग्रेस- २०, इतर – १२, ठाकरे गट – २ तर मनसे आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक ग्रामपंचायत मिळाली आहे.
