भाजप १५६ जागी, कॉंग्रेस १७ जागी तर आप ५ जागी विजयी
अहमदाबाद, दि. ८: सबंध देशाचं लक्ष लागून राहिलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होम पिच असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. १८२ जागा असलेल्या गुजरात विधानसभेत १५६ जागी विजय संपादन करत भारतीय जनता पक्षाने मागील सर्व विधानसभा निवडणुकीतील विजयांचे रेकॉर्ड मोडून टाकले आहेत. या ठिकाणी कोंग्रेस ला फक्त १७ जागी विजय संपादित करता आला असून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ५ जागी आपला झेंडा रोवण्यात यश प्राप्त केले आहे.
भूतो न भविष्याती असा विजय प्राप्त झाल्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातील सर्व भाजप नेत्यांनी आनंद साजरा केला. येत्या १२ तारखेला भाजपच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी आज गांधीनगर येथील भाजप मुख्यालयात ही घोषणा केली. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि पक्षाच्या अन्य नेत्यांनी भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल राज्यातील मतदारांचे आभार मानले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि हर्ष संघवी, कनुभाई देसाई, मनीषा बेन वकील आणि रुषिकेश पटेल यांच्यासह त्यांच्या अनेक मंत्र्यांसह भाजपचे सर्व प्रमुख चेहरे, पक्षाचे युवा नेते अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेल यांनी आपापल्या जागेवरून विजय मिळवला आहे. जामनगर उत्तर जागेवर भाजपच्या रिवाबा जडेजा ५०,४५६ मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसकडून शैलेश परमार, अर्जुन मोरवधिया आणि इम्रान खेडवाला यांनी आपापल्या जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते परेश धनानी आणि विरोधी पक्षनेते सुखराम रथवा यांचा त्यांच्या जागेवरून पराभव झाला आहे. आप ने गारियाधर, जाम जोधपूर आणि विसावदर या चार मतदारसंघात विजय मिळवला असून एका जागेवर पक्ष आघाडीवर आहे. तथापि, आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इशुदान गढवी यांचा भाजपच्या अयार मुलुभाई हरदासभाई बेरा यांच्याकडून १८,७४५ मतांनी पराभव झाला.
२०१७ साली १८२ सदस्यांच्या विधानसभेत भाजपला ९९ तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. गुजरात मध्ये भाजप १९९५ पासून सत्तेत आहे. राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले की, निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल पाहून आपण खूप भारावून गेलो आहोत. लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी ही गती आणखी वेगाने सुरू राहावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक कार्यकर्ता चॅम्पियन आहे आणि हा ऐतिहासिक विजय त्यांच्या अपवादात्मक कठोर परिश्रमाशिवाय कधीही शक्य होणार नाही ज्यांना त्यांनी पक्षाची खरी ताकद म्हणून संबोधले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटले आहे की, गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाचा विजय जनतेचा त्यांच्या धोरणांवर असलेला विश्वास दर्शवतो. एका ट्विटमध्ये, नड्डा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, पक्षाचे राज्य प्रमुख सी. आर. पाटील आणि इतर पक्ष कार्यकर्त्यांचे राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याने गेल्या दोन दशकात विकासाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत, असेही ते म्हणाले. नड्डा पुढे म्हणाले की, गुजरातच्या जनतेने पक्षाला नवा विक्रमी विजय मिळवून दिला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राज्याच्या विकासासाठी आणि मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही अभिनंदन केले.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा विक्रमी विजय निश्चित केल्याबद्दल गुजरातमधील जनतेचे अभिनंदन केले आहे. आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, या अभूतपूर्व विजयाने हे सिद्ध केले आहे की, गेली २७ वर्षे पक्ष सत्तेत असूनही सत्ताविरोधी नाही.
