‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी’- काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी स्मृती इराणींची उडवली खिल्ली
नवी दिल्ली: गुरुवारी (ता.११) उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्या अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसकडून आता स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पदवीवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा आधार घेत ‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी’ म्हणत स्मृती इराणी यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
प्रियांका चतुर्वेदी म्हणतात की, ‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी’ नावाची नवीन मालिका येणार आहे. याची सुरुवातीचे ओळ अशी असणार आहे की, ‘क्वालिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए-नए सांचे में ढलते हैं। एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते हलफनामे नए हैं…क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी.’
यासोबतच प्रियांका चतुर्वेदी यांनी स्मृती इराणी यांचे २००४, २०११, २०१४ च्या शपथपत्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

