निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसच्या नवख्या उमेदवार उर्मिला मातोंडकर शरद पवारांच्या भेटीला
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार व प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी उर्मिला मातोंडकर यांनी त्यांची भेट घेतली. पवार आणि उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. राजकीय परिस्थितीबद्दल दोघांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत आहे. २०१४च्या निवडणूकीमध्ये गोपाळ शेट्टींनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा साडेचार लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे राजकरणात नव्याने उतरलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करुन मार्गदर्शन घेतल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
