गुजरात सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉन ग्रुप दरम्यान १.५४ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब
सामंजस्य कराराबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटर द्वारे दिली प्रतिक्रिया
अहमदाबाद, दि. १३ : गुजरात राज्य सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉन ग्रुप यांच्यामध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब उत्पादनासाठी १.५४ लाख कोटी रुपयांच्या झालेल्या सामंजस्य कराराबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही गुंतवणूक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महत्त्वाची ठरेल आणि त्याचबरोबर निर्माण होणाऱ्या रोजगारामुळे इतर पूरक उद्योगांना आणि त्या अनुषंगाने सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीही साहाय्यकारी होईल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा ट्विटर संदेश शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे,
“हा सामंजस्य करार म्हणजे भारतातील सेमीकंटक्टर उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वाकांक्षांना गती देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही १.५४ लाख कोटींची गुंतवणूक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्वाची आहे. यामुळे इतर पूरक उद्योगांसाठी मोठी परिसंस्था निर्माण करेल आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी साहाय्यकारी ठरेल.”
या प्रकल्पासाठी वेदांता ने आधी महाराष्ट्राची निवड केली होती. पुणे जिल्ह्यातील तळेगाव जवळ हा प्रकल्प होणे अपेक्षित होते. परंतु ऐन वेळी असे नेमके काय झाले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सेमीकंडक्टर प्लांट तयार करण्यासाठी वेदांतने गुजरातमधून भांडवली खर्च आणि स्वस्त वीज यासह आर्थिक आणि गैर-आर्थिक अनुदान मिळवले, असे कळते.
प्रोत्साहनासाठी लॉबिंग करताना, वेदांतने १,००० एकर (४०५ हेक्टर) जमीन ९९ वर्षांच्या लीजवर मोफत मागितली होती आणि २० वर्षांसाठी सवलतीच्या आणि निश्चित किमतीत पाणी आणि वीज मागितली होती, असे रॉयटर्सने एप्रिलमध्ये उघड केले होते. अखेर अलिकडच्या आठवड्यात झालेल्या वाटाघाटीच्या शेवटच्या टप्प्यात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले व बाजी मारली. या सार्या वरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
