गणेश दर्शनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांची उडाली तारांबळ
मुंबई, दि. ४ : गेल्या काही दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसानं कालपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली. आज सकाळपर्यंत काही भागात पाऊस सुरूच होता. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला. मात्र सकाळी दहा वाजल्यानंतर पाऊस ओसरला. पावसाचा उपनगरी रेल्वेसेवेवर परिणाम झाला नाही. आज सुट्टी असल्यानं सकाळी गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांची मात्र तारांबळ उडाली. पावसानं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावले आहेत. राज्यात इतरत्रही पावसानं पुन्हा जोर धरल्याचं चित्र आहे.
वाशिम जिल्ह्यात ऑगस्टच्या प्रारंभी धो-धो बरसलेल्या पावसानं गेल्या २० दिवसांपासून दडी मारली होती त्यामुळे खरीपातली पिकं सुकू लागली मात्र, वाशिम शहरासह जिल्ह्यातल्या धनज, उंबरडा बाजार, इंझोरी अशा अनेक ठिकाणी सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीपातल्या सोयाबीन, तूर आणि कपाशी या पिकांना नवसंजीवनी मिळून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातल्या वर्धमनेरी गावाजवळ असलेल्या नाल्याला पूर आल्यानं आणि पुलावरुन पाणी वाहत असल्यानं आर्वी ते वर्धमनेरी हा रस्ता बंद झाला आहे.
नागपुरात गेल्या २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे. पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सकाळपासूनच पडत असलेल्या पावसामुळे अनेक गणेश मंडळांची तारांबळ उडाली असून, पावसाचं पाणी गणरायाच्या मूर्तीवर पडू नये यासाठी प्लास्टिकची ताडपत्री टाकून विविध प्रयत्न केले जात आहेत. भंडारा जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज सकाळपासून हजेरी लावली आहे. यामुळे पंधरा दिवसापासून उन्हाळा सहन करणाऱ्या जिल्हावासियांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पंधरा दिवसापासून मे महिन्याप्रमाणे जिल्ह्यात उष्णता जाणवत होती त्यामुळे प्रत्येक जण या पावसाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होते. आज पहाटेच्या सुमारास पाऊस बरसला त्यानंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर गेल्या एक तासापासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे वातावरणातही गारवा निर्माण झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून तिथं रिमझिम पाऊस आहे. अमरावतीत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात हवामान ढगाळ झालं आहे मात्र पाऊस नाही तर, उस्मानाबाद इथं रात्रभर रिमझिम पाऊस आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. गणपती आगमन आणि त्यांनंतर गौरी पूजनच्या दिवशी जोरदार पाऊस बरसत आहे. ढगांच्या गडगडासह दुपारी पावसाचं जोरदार आगमन झालं. या पावसामुळे शेतकरी आनंदले असून खरिपाच्या पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने निघालेली रेल्वे मालगाडी करमाळा तालुक्यातल्या केम रेल्वे स्टेशन परिसरात घसरली. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली.