वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
केरळ: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राहुल गांधी यावेळी पारंपारिक मतदारसंघ अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमेठीत राहुल गांधी यांची लढत भाजपाच्या स्मृती इराणी यांच्यासोबत असणार आहे.
राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बहिण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
वायनाड हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. वायनाड येथील मुस्लिम लीगच्या नेत्यांशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींना पूर्ण पाठिंबा देणार असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी स्मृती इराणी यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे यंदाची लढत ही अजूनच चुरशीची ठरणार आहे.