महिलांना डब्यात प्रवेश न दिल्यानं दिवा स्थानकात महिलांचा राडा; मध्य रेल्वे विस्कळीत
मुंबई: मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्थानकात जलद लोकल कर्जत, कसार्याववरून येत असल्यामुळे दिवा स्थानकात महिला प्रवाशांना डब्यात चढता येत नाही. त्यामुळे दिव्यातील महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. असाच प्रकार आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे घडला.
दिवा स्थानकावर सकाळी ६.५६ मिनिटांनी मुंबईला जाणारी जलद लोकल आली होती. या लोकल मधील महिलांच्या डब्यात दरवाजात उभ्या असलेल्या महिलांनी दिव्यातील महिला प्रवाशांना डब्यात प्रवेश करून दिला नाही.
यामुळे संतापलेल्या महिला प्रवाशांनी दरवाजा अडवणाऱ्या महिलांना दरवाजातून खाली खेचले. यानंर दिव्यातील महिला प्रवाशांनी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी ही लोकल अडवून धरण्यासाठी रुळावर ठाण मांडले. हा प्रकार जवळपास १५ मिनिटे सुरू होता. या रेल रोको आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या सर्व लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे.
