…तर राजकारणातून कायमची निवृत्ती घेईन – अजित पवार
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात आपली पहिली सभा वर्धामध्ये घेतली. या सभेत त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली होती. त्यावरुन आज पुण्यातल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींवर जोरदार टीका केली.
‘देशात आज विविध प्रश्न असताना पंतप्रधान मोदी विकासावर न बोलता पवार कुटुंबीयांवर बोलत आहेत. सुसंस्कृत देशाचे पंतप्रधान असे काही बोलतील असे वाटले नव्हते. काही वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे पंतप्रधान आज त्यांचा विकास गेला तरी कुठे? असा सवाल अजित पवारांनी यावेळी केला.
देशाचा आणि पवार परिवाराचा काय संबंध? पवार कुटुंबाची एवढ्या मोठ्या नेत्याला काळजी करण्याचे कारण काय? शरद पवार हे आमचे दैवत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.
मोदींनी स्वतःचे व स्वतःच्या सरकारचे आत्मपरिक्षण करावे पवार कुटुंबियांची काळजी करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकऱ्यांवर झालेल्या मावळ येथील गोळीबारप्रकरणी माझ्यावर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. याशिवाय पोलीस अधिकाऱ्यांचे फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग आणि गोळीबारासंबंधीचा अहवाल आहे. एकदा दूध का दूध आणि पानी का पानी होऊनच जाऊ द्या, यात जर दोषी आढळलो तर मी राजकीय निवृत्ती घेईन आणि जर मी दोषी आढळलो नाही तर आरोप करणाऱ्यांनी निवृत्ती घ्यावी, असे आव्हान अजित पवार यांनी भाजप सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
एकदा एक वादग्रस्त वाक्य माझ्या तोंडून चुकून गेले होते. ते विधान माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, हे मी यापूर्वी जाहीररित्या मान्य केले आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी देखील मागितली. ही बाब आता जुनी झाली असतानाही, सत्ताधार्यांकडून त्यावरून मला लक्ष्य केले जात आहे. सत्ताधारी पक्षाने प्रचारात विकासावर बोलावे; जुना मुद्दा काढण्याचे काय कारण? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
