कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत दुपारनंतर वाढ सुरू झाली आहे. ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून, पावसाने शहरासह जिल्ह्यातही जनजीवनावर परिणाम झाला. जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नृसिंहवाडी येथील मंदिरात रात्री तीन वाजता चढता दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. पुराचे पाणी गाभाऱ्यात गेले आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून कोयना, कृष्णा आणि वेण्णा नदीसह इतर नद्यांच्या पाण्यानं इशारा पातळी गाठली आहे. कोयना धरणक्षेत्रासह खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असून याभागातील शाळा ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील ११ गावातील ३२६ कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.
