मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन
मुंबई, दि. ८ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी पक्ष चिन्हाबाबतच्या एकनाथ शिंदे गटाच्या दाव्यावर ते म्हणाले, ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हेच पक्षाचे निवडणूक चिन्ह राहील, असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जे १५-१६ आमदार माझ्यासोबत आहेत. मी त्यांचे आभार मानतो. शिवसेनेचे कोणतेही नुकसान होणार नाही. मला भेटण्यासाठी कार्यकर्ते सतत येत आहेत. माझ्या सैनिकांचे मन दु:खी आहे, पण मी आणि पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहोत. ते म्हणाले, “शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत संभ्रम आहे, पण कायदेशीररित्या आमचा धनुष्यबाण कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कायदा आणि घटना तज्ज्ञांशी चर्चा करून मी सांगत आहे की, आमचे चिन्ह आमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.
‘मला अभिमान आहे…..’
शिवसेनेने सर्वसामान्यांनाही पुढे केले याचा मला अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले. जे मोठे झाले, ते गेले, जाऊ द्या, पण आजही अनेक लोक शिवसेनेसोबत आहेत. कितीही आमदार गेले तरी पक्ष आमचाच राहणार आहे. विधिमंडळ ही वेगळी गोष्ट आहे, पण पक्ष संघटना वेगळी आहे.
ते म्हणाले की, भाजपने आज जे केले आहे, ते अडीच वर्षांपूर्वी केले असते, तर ‘मविआ’ तयार झाले नसते. लोक सर्व काही पाहत आहेत. आम्ही चुकलो तर जनता आम्हाला निवडणुकीत उत्तर देईल आणि बरोबर असू तर त्यांना उत्तर देईल. राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर मी माझ्या खासदार आणि पक्षातील नेत्यांशी चर्चा करून माझी भूमिका ठरवेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
