राज्यसभेसाठी मतदान पूर्ण, २८५ आमदारांनी केलं मतदान
मुंबई, दि.१०: राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. एकूण २८५ आमदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांपैकी पाच जागांचं चित्र स्पष्ट असलं तरी सहाव्या जागेवर शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केल्यामुळे चुरस निर्माण झाली. दरम्यान मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी नियमांच उल्लंघन केलं असा आरोप करत भाजपाने या दोघांची मतं बाद करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र मंत्री आव्हाड यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे.
अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर सहाव्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी ४१ मतांची आवश्यकता आहे. संख्याबळाचा विचार करता, शिवसेनेकडे ५५, राष्ट्रवादीकडे ५३, काँग्रेसकडे ४४ तर भाजपकडे १०६ आमदार आहेत. त्यामुळे भाजपचे दोन तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून येईल. भाजपच्या तिसऱ्या तसंच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत असून, हे दोन्ही पक्ष आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी अपक्ष तसंच छोट्या पक्षांच्या आमदारांवर अवलंबून आहेत. दरम्यान, राज्यसभेसाठी मतदान करता यावं म्हणून मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा तात्पुरत्या जामीनासाठीचा अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला ज्यानंतर या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता तिथेही देशमुख व माळीक यांच्या नशिबी निराशाच आली. थोड्या वेळात या राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.
