हार्दिक पटेलना न्यायालयाचा मोठा झटका, लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही !
नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना आज गुजरातमधील पटेल समाजाचे युवा नेते आणि अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेल यांना अचानक गुजरात उच्च न्यायालयाने जबर दणका दिला आहे. हार्दिक पटेल यांना २०१५ मध्ये मेहसाणा जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवत गुजरात न्यायालयानं लोकसभा निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.
२०१५च्या मेहसाणा दंगलीच्या वेळी भाजपचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. त्या प्रकरणी हार्दिकला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा रद्द व्हावी यासाठी हार्दिकने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने शिक्षेतून सूट मिळावी अशी विनंती त्यांनी याचिकेतून केली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने त्यांच्याकडे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग आहे. याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीतून हार्दिक पटेल यांचा पत्ता कट झाला आहे.
गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजप व पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हार्दिक पटेल यांच्या खासदारकीच्या स्वप्नावर पाणी फिरलं, असं चित्र सध्यातरी दिसत आहे.
