गुढीपाडव्या च्या सभेत शिवतीर्थावर झाली राज गर्जना
मुंबई, दि.२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते गेले दोन वर्ष ज्याची वाट पाहत होते ती गुढी पाडव्या निमित्त होणारी अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज अखेर शिवाजी पार्क येथे संपन्न झाली. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्व, मशिदीवरील भोंगे, महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या गळ्याभोवती आलेल्या ईडी चौकशी अशा अनेक विषयांवर परखडपणे भाष्य केलं.
वाचा राज ठाकरे यांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे:
“मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील”
प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा. माझी पंतप्रधानांना विनंती आहे की झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका. पोलिसांना देखील माहिती आहे. तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही, या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील.
“राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं”
१९९९ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहिला म्हणून त्यांना जातीवरून सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. ते काही म्हणाले की ते ब्राम्हण आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीका व्हायची. आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असतील, तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार आहेत.
“…..त्यांचे फार्महाऊस आपल्या नावावर करून घ्या”
आमदारांना मुंबईत घरं द्या आणि त्यांचे फार्महाऊस आपल्या नावावर करून घ्या, असं राज ठाकरे म्हणाले. आमच्या आमदाराने सर्वात आधी त्यांना विरोध केला. आमदारांना मिळणाऱ्या पेंशनलाही त्यांनी विरोध केला. ते लोकांसाठी काम करत आहेत, उपकार करत नाही, तसेच मुख्यमंत्र्यांकडे घर कोणत्या आमदाराने मागितलं होतं?
ईडी चौकशीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरें वर केली टीका
माझ्या कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा असं मुख्यमंत्री म्हणालेत, मग पहिल्यांदा त्यांना सांगा की मुंबई महानगर पालिकेत ये जा करू नका… मला ईडीची नोटीस आली मी गेलो ना चौकशीला, अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा. हे सगळं २०१९ चं आहे, या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका.
“पळून कुणाबरोबर गेले अन् लग्न कुणाबरोबर केले” – उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही केली टीका
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पहाटे जोडा वेगळाच पाहायला मिळाला. पळून कुणाबरोबर गेले अन् लग्न कुणाबरोबर केले, काही कळेनाच, असे म्हणत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर तेवढ्यात आवाज आला हे लग्न नाही होणार… अन् फिस्कटलं. दोघेही हिरमसून घरी…हे सगळं सुरु असताना वेगळेच सुरु होते. कुणीतरी मला कडेवर घ्या ना… असे म्हणतेय. तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय… महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणामध्ये असा प्रकार पाहिला नाही. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता? एकमेंकाना शिव्या घालता अन् पुन्हा मांडीला मांडी लावून बसता?
“या मतदारांशी गद्दारी करणाऱ्याला कोणती शिक्षा देणार?”
महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही. व्यासपीठावरून तुम्ही एकमेकांना शिव्या घालता, नंतर जाऊन तुम्ही एकमेकांच्या मांडीवर बसता.’ शिवसेना-भाजप युती तुटली यावर बोलता ते म्हणाले, अडीच वर्षाचं कारण सांगत युती तोडली. या तुमच्या आपसातल्या गोष्टी आहे, याच्याशी आमचा काय संबंध. ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं ते भाजप-शिवसेना युती म्हणून केलं. शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी म्हणून केलं नव्हतं. या मतदारांशी गद्दारी करणाऱ्याला कोणती शिक्षा देणार?
निकाल लागल्यानंतर खास करून उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. अडीच अडीच वर्षे ठरली होती, महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा कधी बोलले नाहीत, इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हा बोलला नाहीत, मोदी – शहा हे दोघे बोलले मुख्यमंत्री फडणवीस होतील तेव्हा बोलले नाहीत. जेव्हा निकाल लागला तेव्हा सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकतं, मग काढलं… अडीच वर्षाचे काय झाले?
