धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई उभी करावी लागेल – शरद पवार
सांगली:, दि.२: देशात धर्माच्या नावानं माणसा-माणसात अंतर निर्माण केलं जात आहे. अशा धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई उभी करावी लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यात शिराळा इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान दिलं, त्यांच्यावरच टीका करणारे नेतृत्व देशात आहे, अशी टीका त्यांनी केली.
शेजारच्या राज्यात अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका, असा चुकीचा निर्णय घेतला आहे. हा धोकादायक प्रकार आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं. पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ऊसापासून फक्त साखर करून चालणार नाही, तर उपपदार्थ करावे लागतील, असा सल्ला त्यांनी या मेळाव्यात दिला. ऊस शेतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, अतिरिक्त ऊसाच गाळप कसं करायचं असा प्रश्न निर्माण होत आहे, ही स्थिती चिंताजनक असून ऊसशेतीबाबत विचार करणं गरजेच आहे, अस ते म्हणाले.
Source-AIR
