उद्यापासून राज्य अर्थसंकल्पीय विधीमंडळाच्या अधिवेशनाला होणार सुरुवात
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार २०२२- २३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा अन्यथा विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
“आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार” – विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस

महविकास आघाडी सरकार हे राज्याच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार असून आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत, अधिवेशनापूर्वी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. या सरकारच्या चहापानाला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
नवाब मलिक यांनी राजीनामा दिलेला नाही, हा एकप्रकारे राज्य घटनेचा अवमान आहे. देशात असं कुठंही घडलेले नाही. मलिक यांचा राजीनामा सरकारनं घेतलाच पाहिजे. त्यांच्या राजीनाम्यासाठी सभागृहात संघर्ष करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
