ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीमध्ये जनतेची कामे वेळेवर होत नसल्याने तसेच गेली ३ वर्षे ग्रामसभाच झाली नसल्याने व जनतेच्या समस्यांकडे केगाव ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने केगाव ग्रामपंचायती विरुद्ध स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. जर या समस्या सुटल्या नाहीत तर केगाव ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ, नागरिकांनी केगाव ग्रामपंचायतीला दिला आहे.
केगाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक समस्या आहेत. मात्र त्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वेळच नसल्याने त्या समस्या अनेक वर्षे तशाच आहेत. त्या समस्या सोडविण्याकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप स्थानिक नागरिक उघडपणे करीत आहेत. केगाव ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची वानवा असून सदर ग्रामपंचायत तर्फे १५ ते २० दिवसांनी तेही एकदाच पाणी सोडले जाते. पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. पिण्याच्या पाण्याचे कोणत्याही प्रकारे नियोजन नाही. कोणत्याही वेळेत पाणी सोडले जाते. शिवाय पिण्याच्या पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटल्या आहेट. त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरते रबर पॅच बांधले जात आहेत. ते पाईप पुन्हा पुन्हा फुटतात व हजारो लिटर पाणी वाया जाते. अनेक ठिकाणी वॉल्व सुद्धा उघडे आहेत. त्याच्यावर झाकणच नाहीत. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्याद्वारे, नाल्याद्वारे वाया जात आहे. एकतर लोकांना १५ ते २० दिवसांनी एकदा पाणी येते. आणि त्यात याची भर. शिवाय वॉल्व उघडे असल्यामुळे या वॉल्ववर कुत्रे, मांजरे, बेडूक तसेच साप आदी विषारी जंगली प्राणी येऊन आपली विष्ठा टाकतात. पाणी घाण करतात आणि तेच पाणी नागरिकांना पिण्याचे पाणी म्हणून सोडले जाते. यातून नागरिकांना विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे. पिण्याचे पाणी सोडण्यासाठी, नळ सोडण्यासाठी तसेच वॉल्व फिरविण्यासाठी अनुभवी, तज्ञ व्यक्तीची नेमणूक करणे गरजेचे आहे. परंतू, हे काम मिळेल त्या व्यक्तीस सांगितले जाते. त्याबाबत ग्रामपंचायतीकडे कोणतेही नियोजन नाही.स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्ये संदर्भात ग्रामपंचायतला कळवून सुद्धा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक या विविध समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात असा आरोप केगाव चे ग्रामस्थ अक्षय पाटील, आतिष हुजरे, प्रवीण पाटील, मृणाल पाटील, प्रेरणा पाटील, विनोद पाटील आदींनी केला आहे.
