संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे थोर अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी जोत्स्ना, विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
पाठक यांनी २५ हून अधिक पुस्तके लिहिली असून विविध गौरव ग्रंथांमध्ये त्यांचे संशोधन लेखही प्रसिद्ध झाले होते. येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ, अंगणातले आभाळ, नाचू किर्तनाचे रंगी, निरंजनाचे माहेर या चार पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळाले होते.
कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठातून १९७८ साली पी.एचडी. केली. त्यांनी मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात ३५ वर्षे अध्यापन केले होते. या शिवाय डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार, संत ज्ञानदेव पुरस्कार, संत विष्णुदास कवी पुरस्कार, चतुरंग पुरस्कार अशा पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शनिवारी पहाटे यशवंत पाठक यांनी अखेरचा श्वास घेतला.
