राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री एन. डी. पाटील यांचं निधन; जाणून घ्या त्यांच्याबद्दल
विधिमंडळाचे सदस्य म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे. सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी एन. डी. पाटील यांना प्रचंड आस्था होती. त्या चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. सीमा भागातल्या मराठी भाषिकांना त्यांचा मोठा आधार वाटायचा. एन. डी. पाटील देखील सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात सातत्यानं आवाज उठवत. त्याशिवाय, समाजातील दुर्बल घटकांसाठी झालेल्या अनेक लढ्यांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण आणि राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात राज्यपालांनी आदरांजली अर्पित केली. एन. डी. पाटील यांच्या निधनानं राज्यातल्या शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ आणि निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवलं, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
एन. डी. पाटील यांच्या निधनानं शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता, असं मुख्यमंत्री म्हणाले. एन. डी. पाटील यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
