दिवाळीनंतर राज्य सरकार राज्यातला कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविणार
महाराष्ट्रात, या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची किमान पहिली मात्रा देण्याच्या दृष्टीने, दिवाळी झाल्यानंतर घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
चालू महिन्यात केंद्राकडून राज्याला कोविड प्रतिबंधक लशींच्या २ कोटीपेक्षा जास्त मात्रा मिळणार असून सुमारे ७० लाख मात्रा शिल्लक आहेत. हे लक्षात घेता नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला लसीची किमान पहिली मात्रा देण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं असून, त्यादृष्टीनं नियोजन सुरु झालं आहे.
लसीची एकही मात्रा न घेतलेल्या, तसंच दुसरी मात्रा प्रलंबित असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याचं काम सध्या प्रशासकीय पातळीवर सुरु असून, दिवाळी झाल्यानंतर या लोकांच्या लसीकरणासाठी विशेष उपक्रमही राबवले जाणार असल्याचं आरोग्य विभागातल्या सूत्रांनी सांगितलं.
