राज्यभरात वसुबारसनिमित्त झाली ठिकठिकाणी गाई-वासराची पूजा
देशातल्या महत्वाच्या सणांपैकी एक असलेल्या पाच दिवसांच्या दिवाळीच्या सणाला आज वसुबारसनं सुरुवात झाली. आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्सद्वादशीला वसुबारस साजरी केली जाते. वसु बारस म्हणजे आपल्या गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून या दिवशी गाय आणि तिच्या पाडसाची पूजा केली जाते. यानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी गाई-वासरांची पूजा करण्यात आली.
पुण्यात पहाटेपासून शहरातील मठ मंदिरांत धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. सार्वजनिक गणेश मंडळांनी आणि हौशी नागरिकांनी शहराच्या विविध चौकांत गाय वासरांच्या पूजनांचे कार्यक्रम आयोजित केले होते. आकाशदिवे उजळून, पणत्या लावून नागरिक उत्साहात दिवाळीचे स्वागत करत असल्याचं दृष्य शहरभर पाहायला मिळत आहे.
वसुबारसनं दिवाळीच्या सणाला सुरुवात झाल्याच्यानिमित्तानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनातल्या कर्मचाऱ्यांना, पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांनी तयार केलेली आकाश कंदीलं आणि मिठाईचं वाटप केलं. विवेक ग्रामविकास केंद्राच्या माध्यमातून ही आकाशकंदिलं राजभवनात पाठवली गेली.
