गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावाची चर्चा
पणजी: मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
गोव्याच्या नव्या मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय प्रमुख नेत्यांच्या बैठकीत घेतले जातील, असे कळते. भाजप आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. तसेच प्रमोद सावंत हे पर्रीकरांचेही अत्यंत विश्वासू होते. यासंदर्भात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचंही नाव चर्चेत आहे.
कोणाच्या गळ्यात गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.