सुरक्षा रक्षकांचा पगार थकविल्याप्रकरणी उलवे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सिक्युरिटी एजन्सीला दणका
उरण, दि.२(विठ्ठल ममताबादे): उलवे शहर परिसरातील विमानतळ बाधित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ५० हुन अधिक सुरक्षा रक्षकांचा पगार एका सिक्युरिटी एजन्सीने दोन महिन्यांपासून थकवला होता. या तरुणांनी कंपनी प्रशासनाला वेळोवेळी संपर्क करून देखील हि एजन्सी पगार देण्यास टाळाटाळ करत होती. अखेर येथे काम करणाऱ्या अमोल गायकवाड यांनी मनसेचे चिराग कोळी यांना संपर्क केला असता त्यांनी तातडीने याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव आणि स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना कळवले.
यावेळी स्थानिक मनसे सरचिटणीस अनिकेत ठाकुर, सचिव मनोज कोळी, वहाळ पंचायत समिती अध्यक्ष कल्पेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली गव्हाण विभाग उपाध्यक्ष प्रितम तांडेल, कोंबडभुजे शाखाध्यक्ष चिराग कोळी, गणेशपुरी उपशाखाध्यक्ष सुनिल कोळी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कंपनीकडे कामगारांच्या थकवलेल्या पगाराबद्दल बोलणी सुरू करून अगदी दोन दिवसातच थकीत पगार सुरक्षा रक्षक तरुणांना मिळवून दिला. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी सिक्युरिटी एजन्सीच्या कार्यालयात धडक देऊन यापुढे तरुणांचे पगार थकवू नये आणि त्यांना कामामध्ये कसल्याही प्रकारचा त्रास देऊ नये याबद्दल सूचना केल्या. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय दिल्याबद्दल कामगारांनी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
