संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी सुरुवातीलाच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज आज दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहताच संसदेच्या सभागृहात गोंधळ सुरू झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहाच्या हौद्यात येउन कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करत, इंधनदरवाढी विरोधात मोठमोठ्याने घोषणा दिल्या.
अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नव्या कॅबिनेट सहकाऱ्यांची ओळख करून देतात, अशी प्रथा आहे. अनेक स्त्रिया, दलित तसेच आदिवासी सदस्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानं उत्साहाचं वातावरण असेल असं वाटलं होते अशा शब्दात मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोदी पुढे म्हणाले की मागासवर्गातील तसंच शेतकरी समुदायातील अनेकांचा या मंत्री परिषदेत समावेश करण्यात आला आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळाविषयी नाराजी व्यक्त करून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान नव्या मंत्र्यांची ओळख करून देत असताना विरोधी पक्ष सदस्यांनी अशा गोंधळ घालणे दुर्दैवी आहे.
अधिवेशनाच्या दोन सत्रांदरम्यानच्या कालावधीत दिवंगत झालेल्या ४० माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून नंतर संसदेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित केले.
Source – AIR
