कोकणासह राज्यात पावसाची धुवांधार बॅटिंग चालूच
मुंबई, दि.१६: रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. राजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे म्हाळुंगे गावात जमिनीला सुमारे पाचशे मीटर अंतरापर्यंत भेगा पडल्या. यामुळे बाजूच्या एका घराला तडे गेले आहेत. या घरातल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत.पाचल इथल्या अर्जुना पाटबंधारे प्रकल्पाचा कालवा फुटण्याची शक्यता असल्यानं काही वाड्यांना धोका असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य जयप्रकाश नारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात काल सध्याकाळी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे साखरखेर्डा जवळच्या जांबुवंती नदीला पूर आला होता. त्यामुळे लव्हाळा – साखरखेर्डा – दुसरबीड मार्ग काही काळासाठी बंद झाला होता.उस्मानाबादमध्ये आणि अकोल्यात काल रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तिथे आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
नांदेड शहरालगतच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा आज सकाळी सव्वा पाच वाजता उघडला. या दरवाजातून गोदावरी नदीपात्रात १६ हजार ६३२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
