मान्सून अपेक्षेप्रमाणे ३१ मे रोजी केरळमध्ये बरसणार
केरळ: नैऋत्य मान्सून मालदीव बेटांच्या परिसरात पोहोचला असून अपेक्षेप्रमाणे ३१ मे रोजी तो केरळमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीनं हवामान पोषक असल्याचं काल वेधशाळेकडून सांगण्यात आलं. इकडे राज्यात दररोज कुठेना कुठे पाऊस हजेरी लावत असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात तापमानही वाढलं आहे. काल या भागात बहुतांश ठिकाणी पारा ४० अंशांच्या पुढेच होता.
सर्वाधिक ४३ पुर्णांक १ दशांश अंश सेल्सीअस तापमान ब्रह्मपुरीत नोंदवलं गेलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या महिना अखेरपर्यंत तापमानात फारशी वाढ संभवत नाही. उलट दररोज संध्याकाळी तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.
