राज्यात अवकाळी पावसाची अवकृपा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा परिसरात काल सायंकाळी झालेल्या वादळी पावसात मेटकरी वस्ती इथं अंगावर वीज पडून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
मंगळवेढा तालुक्यात कर्जाळ, कात्राळ, कागस्ट, डिकसळ, नंदूर, बालाजीनगर, मरवडे आदी भागात वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरचे पत्रे उडून गेले आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांची आणि मेटकरी वस्ती इथल्या दुर्घटनेची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत. तसंच मृत मुलीच्या कुटुंबाला तातडीनं शासकीय आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मेहकर तालुक्यातल्या देऊळगाव साखरशा परिसरात पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे.
चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, इत्यादी भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्यानं कांदा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यात काल मुगट शिवारात अंगावर वीज पडून १ महिला ठार, तर ३ महिला जखमी झाल्या. जखमींना रूग्णालयात दाखल केले आहे.
