उरण च्या ॐ दत्त परिवाराचे संस्थापक ठाकूर महाराज यांचे दुःखद निधन
उरण, दि. १६(विठ्ठल ममताबादे): ॐ दत्त परिवाराद्वारे असंख्य भक्तगणांना प्रपंचात राहून परमार्थात रमायला शिकवणारे, नामस्मरणाच्या जोरावर अनेक संकटांवर मात करुन यशाकडे नेणारा मार्ग दाखवणारे अध्यात्मिक क्षेत्रातील संत परमपूज्य ओम दत्त श्री. ठाकूर महाराज (वय ८०)यांनी गुरुवार दिनांक १५ एप्रिल रोजी दुपारी पुणे येथील सौदामिनी संकुल येथे देह ठेवला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उरण(नागाव) हे जन्मगाव असलेले परमपूज्य श्री. ठाकूर महाराज यांनी ॐदत्त परिवाराची स्थापना केली आणि अनेक भक्तांना मार्गदर्शन करुन श्री दत्तगुरुंच्या महिम्याची प्रचिती दिली.
श्री क्षेत्र गाणगापूर येथे दत्तगुरुंच्या चरणी श्री. ठाकूर महाराज यांनी अनेक सेवा अर्पण केल्या. मुंबई, पुणे, गोवा, डोंबिवली, रत्नागिरी, ठाणे, रोहा व परदेशात मोठ्या प्रमाणावर ॐदत्त परिवाराचे अनुयायी आहेत. ओम दत्त परिवारातर्फे दरवर्षी आरोग्य शिबीर, गोरगरिबांना वस्तू वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम निस्वार्थी भावनेने समाजात राबविले जातात. ठाकूर महाराज यांच्या निधनाने त्यांच्या शिष्य परिवारात शोककळा पसरली असून त्यांच्या शिष्यांनी, अनुयायांनी शासनाच्या कोरोना विषयक मार्गदर्शक तत्वाचे पालन करत आपल्या घरातूनच त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
