यंदा इथेनॉलचे वाढीव उत्पादन घेतल्यानंतरही सुमारे ११० लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित
यंदाचा साखरेचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना उपलब्ध शिल्लक साखरेचा बोजा कायम राहणार असून या साखरेची देशांतर्गत विक्री तरी कशी करायची असा प्रश्न कारखान्यांपुढं निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षीची सुमारे ४६ लाख टन शिल्लक साखर लक्षात घेऊन यंदाच्या गाळप हंगामात साखरेऐवजी इथेनॉलचं जादा उत्पादन घेण्याची सूचना केली गेली होती, त्यानुसार यंदा इथेनॉलचं वाढीव उत्पादन घेतल्यानंतरही सुमारे ११० लाख टन साखरेचं उत्पादन अपेक्षित असून आत्तापर्यंत त्यापैकी ९८ लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे.
त्यामुळं गेल्या वर्षीच्या शिल्लक साखरेत या नवीन साखरेची भर पडली आहे. त्यातच देशातील अनेक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याने अनेक कार्यक्रम आणि सण समारंभावर निर्बंध आले आहेत, त्याचा थेट परिणाम साखर विक्रीवर दिसून आला असून राज्यातील कारखान्यांना चालू महिन्यात देण्यात आलेला ३९ लाख टन साखर विक्रीचा कोटा अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही.
या महिना अखेरपर्यंत त्यापैकी फक्त ३० लाख टन साखरेची विक्री झाली असून साखर निर्यातीलाही कोरोनाचा फटका बसू लागला आहे. एकंदरीत साखर उद्योगावर पुन्हा एकदा निराशेचे ढग दाटू लागल्याचं स्पष्ट झालं आहे.
