मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
• वाढीव वीजबिलांविरोधात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनं केली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाले. आम्ही राज्य सरकारशी, राज्यपालांशी पाठपुरावा केला. त्यानंतर महाविकास आघाडीचे मार्गदर्शक श्री. शरद पवार साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी वीज कंपन्यांच्या नावाने पत्रं मागवली, आम्ही पत्रं पाठवली तर पुढच्याच दिवशी अदानी पवारसाहेबांच्या घरी येऊन गेले. त्यानंतर सरकारचीही भूमिका आली की नागरिकांना वीजबील भरावंच लागेल. सर्व वीज कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करतंय. आता प्रश्न आंदोलकर्त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विचाराल की सरकारला?
• लॉकडाऊनमध्ये वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून तुम्ही नागरिकांची पिळणार असाल, छळणार असाल तर जनतेने का सहन करायचं?
• लोकांसाठी नाही तर एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी राज्यात सध्या इतर राजकीय पक्षांची आंदोलनं सुरु आहेत. भाजपने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यापेक्षा केंद्राशी बोलावं ना? तुमचंच सरकार आहे ना!
• सरकारने भारतरत्नांना अशाप्रकारे ट्विट करायला सांगणं चुकीचं आहे. एखाद्या सरकारी धोरणासाठी भारत सरकारने भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही कर्तृत्ववान माणसं आहेत पण साधी माणसं आहेत. आपल्या भारत सरकारने सांगितलं म्हणून त्यांनी ट्विट केलं पण आज सर्व रोषाला त्यांनाच सामोरं जावं लागतंय.
• रिहानाने एक ट्विट केलं तर सर्व आगपाखड करतायत आणि म्हणतायत कि आमच्या देशाचा प्रश्न तू नाक खुपसू नको मग ‘अगली बार ट्रम्प सरकार’ म्हणत जाऊन भाषणं करायचीही गरज नव्हती, तोही त्यांच्या देशाचा प्रश्न होता.
• भाजप आणि शिवसेनेची ज्यावेळेस केंद्रात-राज्यात सत्ता होती तेव्हाच ‘संभाजीनगर’ हे नामांतर का नाही झालं? देशातल्या अनेक शहरांची, दिल्लीतल्या रस्त्यांची नावं बदलली गेली. पण औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं ? ह्याचं उत्तर भाजप-शिवसेनेने द्यावं.
• पुण्यात शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं. पण मला प्रश्न पडतो की, त्याला कुणी हे बोलायला लावलंय का? कारण सध्या राज्यात अशाच पद्धतीचं राजकारण सुरु आहे. कुणाला तरी बोलायला लावायचं आणि त्यावर मग राजकारण करायचं.
