“कोरोनाच्या काळात कोणत्याही घटकाला या सरकारने मदत केली नाही” – फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका
औरंगाबाद, दि. २३: विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकारवर सडकून टीका केली. माजी मंत्री पंकजा मुंडे, अतुल सावे, विजया रहाटकर आणि अन्य सहकारी यावेळी उपस्थित होते.
वाचा या पत्रकार परिषदेतील फडणवीस यांनी मांडलेले मुख्य मुद्दे :
● मराठवाडा पदवीधर मतदारसंघात (औरंगाबाद विभाग) विविध संघटना, संस्था, शिक्षक, वकिल, डॉक्टर्स, सीए अशा सर्वच घटकांचा मोठा पाठिंबा भाजपाचे उमेदवार शिरिष बोराळकर यांना मिळतो आहे.
● मराठवाडा आमच्या सरकारच्या काळात प्राधान्यक्रमावर होता. मराठवाडा वॉटरग्रीडच्या कामाला प्रचंड वेग देण्यात आला होता, आता या सरकारने हा प्रकल्प ‘कोमा’मध्ये टाकला आहे. मराठवाड्यातील अन्य प्रकल्प सुद्धा शीतपेटीत.
● विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या सरकारच्या अजेंड्यावर नाही. केवळ काही भाग किंवा मतदारसंघ एवढ्यापुरतेच सरकार मर्यादित.
● वीजबिलांसंदर्भात तीन कॅबिनेट मंत्री सवलतीची घोषणा करतात, आणि आता घूमजाव करीत म्हणतात, बिलं भरा. शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठा असंतोष आज दिसतोय
● अतिवृष्टी, बोंडअळी यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. पण, कोणतीही मदत या सरकारने शेतकर्यांना दिली नाही. जो काय शेतमाल आला, त्याच्या खरेदीची कोणतीही व्यवस्था नाही.
● कोरोनाच्या काळात कोणत्याही घटकाला या सरकारने मदत केली नाही. काहीही झाले की, केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. अन्य छोटी-छोटी राज्य सुद्धा विविध घटकांना मदत करताहेत.
● प्रशासनातील सावळा गोंधळ बाहेर काढला नाही, तर जनता आम्हाला माफ करणार नाही. बार उघडले, मॉल उघडले, सिनेमागृह उघडले, मग मंदिर उघडा म्हटले तर सरकारला इतके वाईट का वाटते.
