हिमाचल प्रदेशात अटल बोगद्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
हिमाचल प्रदेश, दि.३: सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास सरकार पूर्ण ताकदीनं करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज हिमाचल प्रदेशात रोहतांग इथं अटल बोगद्याचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. जगातल्या सर्वात लांब अशा या महामार्ग बोगद्याचं बांधकाम सीमा रस्ते संस्थेनं केलं आहे.
या बोगद्यामुळे मनाली आणि लेहमधलं अंतर ४६ किलोमीटरनं कमी झालं असून ९ किलोमीटर २ मीटर लांबीच्या या अटल बोगद्यामुळे ५ ते ६ तासांचा प्रवास वाचणार आहे. या भागात जास्त बर्फवृष्टी होत असल्यानं वर्षातले ६ महिने बंद असणारा मनाली लाहौल-स्पिटी व्हॅली हा मार्ग आता वर्षभर खुला राहायला मदत होणार आहे.
माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ रोहतांग बोगद्याचं नामकरण अटल बोगदा करण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर, संयुक्त संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमूख जनरल मनोज नरवणे उपस्थित होते.
दरम्यान, काँग्रेस सरकारनं देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड केल्याचा आरोप करत देशाच्या सुरक्षेलाच आपल्या सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
