चित्रपटगृह तात्काळ सुरु करायला परवानगी द्यावी – भारतीय मल्टिप्लेक्स संघटनेची मागणी
मुंबई/नवी दिल्ली: चित्रपटगृहाच्या माध्यमातून देशभरात हजारो रोजगार पुरवले जातात मात्र, गेले सहा महिने चित्रपटगृह बंद असल्यामुळे या क्षेत्राचे अंदाजे नऊ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, सरकारनं चित्रपटगृह तात्काळ सुरु करायला परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय मल्टिप्लेक्स संघटनेनं केली आहे.
हे क्षेत्र दोन लाख लोकांना थेट तर त्याहून अधिक व्यक्तींना अप्रत्यक्ष रोजगार पुरवते असं संघटनेनं म्हटलं आहे. देशभरातल्या करोडो लोकांचं मनोरंजन करणारं हे क्षेत्र गेली सहा महिने बंद असल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान तर झालच आहे. मात्र आता त्यातील अनेक रोजगार धोक्यात आले आहेत.
हे लक्षात घेऊन सरकारनं सिनेमागृह सुरु करावेत, अशी मागणी समाजमाध्यमावर तसंच वृत्तपत्राच्या माध्यमातून ‘अनलॉक सिनेमा-सेव जॉब्स’ या हॅशटॅगद्वारे केली आहे. देशात मॉल्स, विमानसेवा, रेल्वे, हॉटेल्स तसेच व्यायामशाळा अनलॉक इंडियाअंतर्गत टप्याटप्यानं सुरु झाली आहेत. कोरोनाविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन ही सेवा सुरु करण्यासाठी सज्ज असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.
