राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार भाजपच्या वाटेवर?
पंढरपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये रोज नव नवीन चित्र पाहावयास मिळत आहे. भाजप आज माढा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव जाहीर करणार आहे. या जागेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र आता रणजितसिंह यांच्या जागी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
भाजपने काही दिवसापूर्वी माढा मतदारसंघात सर्वेक्षण केले, त्यावेळी त्या सर्वेक्षणामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे माढा मतदारसंघात भाजपकडून विजयसिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र विजयसिंह यांनी अधिकृतरीत्या भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही.
विजयसिंह मोहिते पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांचं आव्हान असणार आहे.
