बालाकोट हल्ल्यामध्ये एकही दहशतवादी मेला नाही याचा खुलासा सुषमा स्वराज यांनी केला आहे : प्रकाश आंबेडकर
शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करत भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा निषेध करायचा सोडून शिवसेना भाजपला का पाठिंबा देत आहे? याचे स्पष्टीकरण शिवसेनेने राज्यातील जनतेला द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. कुर्ला नेहरुनगर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला.
२६\११ च्या आत्मघाती हल्ल्याचा आरोपी कसाब हा फक्त मुंबई पोलिसांच्या धैर्यामुळे, कर्तृत्वामुळे जिवंत पकडला गेला त्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादी संबंध देशासमोर आले. ज्या पोलिसांनी जीवाची बाजी लावत देशाचे रक्षण केले त्यांचा अपमान आम्ही सहन करुन घेणार नाही, असा इशारा आंबेडकरानी दिला.
२००८ च्या हल्ल्यानंतर शहिदांचे फोटो सन्मानाने शिवसैनिकांनी शिवसेना शाखेत लावले गेले आता कोणत्या तोंडाने शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपाला मते देणार याचे उत्तर सैनिकांनी द्यावे? तसेच शिवसेनेला भाजपच्या कुबड्यांची गरज का पडली? याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
देशाचे पंतप्रधान मोदी हे सर्वात मोठे ब्लँकमेलर आहेत. त्यांनी आतापर्यंतचे सर्व राजकारण ब्लँकमेल करुन केले आहे. मोदींचे व्यक्तिमत्व खोटारडे आहे. बालाकोट हल्ल्यामध्ये एकही दहशतवादी मेला नाही याचा खुलासा सुषमा स्वराज यांनी केला आहे. मोदी यांच्या खोटारडेपणामुळे आपला देश तोंडावर पडला, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी केली.
